धुळे प्रतिनिधी प्रकाश नाईक
धुळे :-समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, धुळे येथील बी. एस. डब्ल्यू. प्रथम वर्ष या वर्गातील अभ्यासक्रमातील क्षेत्रकार्याचा महत्त्वाचा घटक असलेल्या ग्रामीण अध्ययन शिबिराचे आयोजन दि.६ जानेवारी २०२५ ते ११ जानेवारी २०२५ या कालावधीत जुनवणे, तालुका जिल्हा धुळे येथे करण्यात आले आहे. सदर ग्रामीण अध्ययन शिबिराचे उद्घाटन समारंभ दि. ६ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले. सदर उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमाला मा. प्रो.डॉ. संजय ढोडरे संचालक, महात्मा गांधी तत्त्वज्ञान केंद्र, धुळे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते, तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ सर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुण्यांमध्ये मा. योगेश खैरनार (उपसरपंच), मा. जितेंद्र वाघ (पोलीस पाटील), मा. मनोज पाटील (मुख्याध्यापक, जि.प. शाळा), मा. विनोद जोशी (मुख्याध्यापक, माध्यमिक विद्यालय),मा. अमोल खैरनार(महसूल सेवक), मा. हरिचंद्र खैरनार तसेच शिबिराचे समन्वयक प्रा. मेघावी मेश्राम, प्रा. डॉ. संजीव पगारे आणि डॉ. दिलीप घोंगडे उदघाटन प्रसंगी उपस्थित होते. सुरुवातीला प्रा. डॉ. संजीव पगारे यांनी ग्रामीण अध्ययन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक मा. प्रो. डॉ. संजय ढोडरे यांनी उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करीत असताना युवकांनी त्यांच्यामधील ऊर्जेचा योग्य पद्धतीने स्वतःच्या आणि समाजाच्या विकासासाठी उपयोग करायला हवा. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, चांगली वागणूक, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास यासंबंधी विविध उदाहरणासह सोप्या शब्दांमध्ये विद्यार्थ्यांना युवकांचे समाजामध्ये असलेले महत्त्व समजून देण्याचा प्रयत्न केला तसेच गावातील लोकांशी कसा सुसंवाद केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना गाव कसे असते आणि गावामध्ये कशी रचना असते आणि गावाची कशाप्रकारे माहिती घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. विनोद जोशी सरांनी विद्यार्थ्यांना समाजकार्य क्षेत्राची निवड केल्याबद्दल विशेष असे कौतुक केले आणि जुनवणे गावातील परिस्थिती, समस्या आणि अडचणी समजून आणि प्रत्यक्ष अनुभव घेऊन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ यांनी मार्गदर्शन करीत असताना विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाशी समरस होऊन जुनवणे गावाचा लोकसहभागातून ग्रामीण अध्ययन या तंत्राचा वापर करून प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी सांगितले. बी. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या ग्रामीण अध्ययन शिबिराचे समन्वयक म्हणून प्रा. मेघावी मेश्राम, डॉ. संजीव पगारे आणि डॉ. दिलीप घोंगडे यांनी आयोजन आणि नियोजन केलेले आहे. ग्रामीण अध्ययन शिबिराच्या उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालक प्रा. मेघावी मेश्राम तसेच आभार प्रदर्शन डॉ. दिलीप घोंगडे यांनी केले.