आरोग्य सेवेतील नवा आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य विकासाचा प्रयत्न...
धडगाव:- दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी. ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन, धडगाव. या सेवाभावी संस्थेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र तेलखेडी येथे ‘आरोग्यदूत सक्षमीकरण कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आरोग्य सेवा पुरवणाऱ्या आशा वर्कर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे संवाद कौशल्य वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे हा होता. कार्यशाळेमध्ये क्रियाकलाप आणि संवादावर आधारित विविध सत्रे आयोजित करून सहभागी कर्मचाऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
_*संवाद कौशल्यांचा विकास हाच मुख्य उद्देश*
आशा वर्कर आणि प्राथमिक आरोग्य कर्मचाऱ्यांना ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात जागरूकतेचा अभाव, चुकीच्या समजुती, आणि काही ठिकाणी लोकांचा विरोधदेखील त्यांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात लोकांशी सकारात्मक आणि प्रभावी संवाद साधला, तर त्यांचे काम आणखी सुलभ होऊ शकते. याच विचारातून ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशनने ही कार्यशाळा राबवली.
*कार्यशाळेतील महत्त्वाचे सत्र आणि क्रियाकलाप*
कार्यशाळेची सुरुवात उद्घाटन समारंभाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून तेलखेडी उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश तडवी उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कार्यशाळेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “ग्रामीण भागात आरोग्य सेवा पोहोचवणे हे महत्त्वाचे असून, यासाठी आशा वर्कर आणि आरोग्य कर्मचारी हे खरे आरोग्यदूत आहेत. तुमच्या प्रभावी संवादामुळे गावातील लोक आरोग्याबाबत अधिक जागरूक होतील.”
तसेच या प्रसंगी मुख्य मार्गदशक म्हणून ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक श्री. शैलेन्द्र वळवी होते. त्यांनी विविध खेळ व क्रियाकलापाच्या माध्यमातून चांगले संभाषण कौशल्य, नेतृत्वगुण विकास, टीम वर्क, वेळेचे व्यवस्थापन, आणि गंभीर परिस्थितीचा सामना कसा करावा? आदि विषयांवर उपस्थित आशा सेविकांना त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदारी प्रति माहिती देऊन प्रबोधन केले. तसेच ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन चे समन्वयक आकाश पावरा, दिनेश पावरा, अंकुश वसावे, मनिषा पावरा, किरण पावरा. व मिनाक्षी वळवी यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतले. तसेच तेलखेडी PHC चे गीतांजली गावीत, भूपेंद्र पाडवी, मोजीलाल जाधव, राकेश पावरा, उषा पावरा व तेलखेडी आरोग्यकेंद्र मधील आशा पर्यावेक्षिका आणि सर्व आशा सेविका आदि उपस्थित होते.
ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशनचा प्रयत्न
_आरोग्य सेवेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सक्षम करणे हे ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशनचे मुख्य ध्येय आहे.“आरोग्यदूत म्हणजे आशा सेविका ह्या गावागावातील खऱ्या हिरो आहेत. ते लोकांचे जीवन वाचवण्यासाठी अविरत मेहनत घेतात. मात्र, काम करताना येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन आणि कौशल्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ही कार्यशाळा त्याच दिशेने एक पाऊल आहे.” असे प्रतिपादन ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन. अध्यक्ष श्री. इंजि. प्रविण पावरा. यांनी केले.