चुलवड आश्रम शाळेत किशोरवयीन मुला-मुलींना देण्यात आले स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि करियर मार्गदर्शनाचे धडे

धडगाव :-ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन धडगांव या स्थानिक सेवाभावी संस्थेच्या वतीने चुलवड येथील आश्रम शाळेत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यशाळेत किशोरवयीन मुला-मुलींना स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि करियर मार्गदर्शन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या संस्थेचे उद्दिष्ट आदिवासी विद्यार्थ्यांना  पॉक्सो अॅक्ट -2012 विषयी मार्गदर्शन करणे व त्यांच्या आरोग्याबाबत जागरूक करणे, तसेच शिक्षणाच्या संधींची माहिती देणे आणि त्यांना उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणे हे होते. कार्यशाळेची सुरुवात जयपाल मुंडा यांची प्रतिमा शाळेला भेट देऊन करण्यात आली.

       कार्यशाळेत *POSCO कायदा 2012* विषयीही सखोल माहिती देण्यात आली. मुलांचे लैंगिक शोषण टाळण्यासाठी कायदेशीर संरक्षण मिळवण्यासाठी POSCO कायदा किती महत्त्वाचा आहे, याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली गेली. यामुळे त्यांना आपले हक्क आणि संरक्षणाचे मार्ग समजून घेता आले.

       मुलांना *पोषण आणि बालविवाह* यांसारख्या समस्यांविषयी जागरूकता देण्यात आली. कुपोषण आणि योग्य आहाराच्या अभावामुळे आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो, तसेच बालविवाहाच्या समस्येने किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि शिक्षण दोन्ही बाधित होते. या संदर्भात योग्य मार्गदर्शन करून मुलांना कुटुंबीयांशी संवाद साधण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.

     किशोरवयातील मुलींना *मासिक पाळीच्या* काळात स्वच्छता राखणे किती आवश्यक आहे याबद्दल मार्गदर्शन देण्यात आले. स्वच्छता राखल्यामुळे अनेक आजारांना आळा घालता येऊ शकतो हे समजावून सांगण्यात आले.

      याशिवाय, या कार्यशाळेमध्ये मुलांना त्यांच्या शिक्षणाची आणि करियरची दिशा ठरवण्यासाठी सल्ला देण्यात आला. भविष्यातील संधींचे महत्त्व आणि शिक्षणाच्या माध्यमातून कसे प्रगती साधता येईल, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले. विविध क्षेत्रांमध्ये करियर घडविण्याचे मार्गदर्शन देत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून शिक्षणामध्ये कसे लक्ष द्यावे, याची माहिती देण्यात आली.

     ट्रायबल व्हॉईस फाउंडेशन'चे या कार्यशाळेसाठीचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांना त्यांच्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाण करून देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी असे कार्यक्रम अत्यंत गरजेचे आहेत. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेण्याची क्षमता विकसित होईल आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्याची दिशा मिळेल. अशा शब्दांत कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे शिक्षक डी. बी. वसावे सरांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

      कार्यशाळेत ट्रायबल व्हॉईस फाऊंडेशन चे प्रकल्प व्यवस्थापक शैलेन्द्र वळवी, समन्वयक आकाश पावरा, अंकुश वसावे, दिनेश पावरा, मनिषा पावरा, किरण पावरा व मिनाक्षी वळवी. तसेच, शाळेचे शिक्षक जे. बी. वसावे, बी. के. पटले, जी. एस. पावरा, डी. बी. वसावे व ए. एम. राहसे सर आदि उपस्थित होते.  तर ही कार्यशाळा राबविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी. जी.पाटील सरांनी विशेष सहकार्य केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

Advertisement

पत्ता :- दिलवर हेअर सोलूनच्या शेजारी मेन धडगाव जि. नंदुरबार