नंदुरबार :- दि. ७ चार वर्षापासून प्रलंबित असलेली प्राथमिक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतील त्यांच्या हक्काची रक्कम पावती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटनेने याबाबत सतत पाठपुरावा, तूरवाद्य आंदोलन करण्यात आले होते. त्याला यश आले आहे. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावित, कार्याध्यक्ष विश्वास देसाई, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी हि माहिती दिली. शिक्षकांना स्वत:चे आजारपण, मुलांचे शिक्षण, लग्न, घरबांधणी, घरदुरुस्ती याकरीता भविष्य निर्वाह निधीतून विना परतावा व परतावा कर्ज दिले जाते. सदर कर्ज मागणीस जिल्हा परिषदेची मंजुरी मिळाल्यानंतर मंजूर कर्ज रक्कम राज्य शासनाकडून बी. डी. एस. प्रणाली द्वारे जिल्हा परिषदेच्या वित्त विभागास दिली जाते. त्यानंतर सदर रक्कम शिक्षकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. याकरिता भविष्य निर्वाह निधीची पावती नसल्यामुळे विनाकारण जिल्हा परिषद ला शिक्षकांच्या प्रलंबित जीपीएफ स्लिपा बाबत मोठी अडचण निर्माण झाली होती. २०१९-२० पासून २०२३-२४ वर्षाच्या नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांच्या भविष्य निर्वाह निधीच्या शिक्षक खातेदारांच्या अद्यावत भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना बुधवार दि.७ रोजी नंदुरबार ,शहादा नवापूर वाटप, दि. ८ रोजी तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्याला वाटप करण्यात येत आहे. जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांच्या उपस्थितीत झाला. प्रहार शिक्षक संघटनेमार्फत प्रशासनाचे अभिनंदन करण्यात आले आहे. या वेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पांडुरंग कोल्हे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश घोलप, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण आदी उपस्थित होते. या विवरण पत्रांमध्ये, ज्या महिन्यांमध्ये वर्गणी दर्शवण्यात आली नसेल, अशा महिन्याची जीपीएफची शेड्युलची कपात प्रत वित्त विभागात सादर केल्यास सुधारित प्रत तात्काळ निर्गमित केली जाईल. संबंधित गट शिक्षणाधिकारी कार्यालयांनी त्यांच्या अधिनस्त सर्व शाळेतील शिक्षकांना या भविष्य निर्वाह निधीच्या स्लीप वितरित कराव्यात व उलट टपाली त्याची पोच विभागात सादर करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी यांनी केले. तालुक्याकडून नियमितपणे दर महा शेड्युल प्राप्त झाली तर हे काम कमी वेळात होऊ शकेल असेही मुख्य लेखा वित्त अधिकारी प्रवीण देवरे यांनी सांगितले आहे. या विवरणपत्राव्दारे भविष्य निर्वाह निधीमध्ये असणारी रक्कम त्यांना समजणार आहे.
तालुकानिहाय भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्र
२०१९-२० पासून २०२३-२४ या वर्षाच्या नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत शाळांच्या भविष्य निर्वाह निधीच्या शिक्षक खातेदारांच्या अद्यावत भविष्य निर्वाह निधीची विवरणपत्रे देण्यात आली. यासाठी कार्यालयीन लिपिक योगिता गावित, राजेश्री गावित यांनी परिश्रम घेतले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाडी,वस्ती, पाड्यातील शिक्षक बांधवांनी प्रहार शिक्षक संघटनेचे, तसेच प्रशासनाचे आभार मानले आहे.